Wednesday 20 June 2012

लोहगड चिरेबंदी वाट ......




लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे.त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड.

लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते.पलीकडेच तिकोना उर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे.तुंग उर्फ कठीणगडहि येथेच आहे.अंदरमावळ आणि पवनमावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे.
लोहगडावरच्या इमारती पडलेल्या आहेत.नाना फडणीस यांनी बांधलेली एक विहीर गडावर आहे.नानांचा शिलालेखही त्या विहिरीवर आहे.१०० लोक झोपू शकतील एवढी एक गुहासुद्धा गडावर आहे.लोहगडाचे उत्तरेकडचे टोक निमुळते होत गेले आहे.त्याला थोडी तटबंदी आहे.या माचीचे नाव आहे विंचूकाटा टोक.गडाच्या माचीच्या खाली दात जंगल आहे.

लोहगडाचा उपदुर्ग असलेल्या वीसपुरावर मोठी सपाटी आहे.तशीच मोठी दगडी तटबंदी आहे.प्राचीन शिलालेखही आहेत.डोंगराच्या पोटात भाज्याची लेणी आहेत.ती दोन हजार वर्षापूर्वी कोरलेली आहेत.

लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट.अशी रेखीव वाट फार कमी दुर्गांवर पहावयास मिळते.लोहगडवाडी पार केली कि हि सर्पाकार वाट सुरु होते.एकदा का कोणी या वाटेवर पाय टाकला कि मग तो माणूस वर येईस्तो पहारेकर्यांच्या नजरेआड जात नाही.तो व्यवस्थित हेरला जातो.वाटेवर वेगवेगळे बुरुज आहेत.त्यावरून बाहेरून येणाऱ्या माणसावर नजर ठेवली जाते.वाटेवर गणेश दरवाजा,दुसरा नारायण,तसरा हनुमान,आणि चौथा महादरवाजा,असे चार दरवाजे आहेत.हनुमान दरवाजा जुना आहे.इतर तीन दरवाजे आणि एक उत्तम रेखीव जिना नाना फडणीस यांनी बांधून घेतले आहेत.दुसर्या आणि तिसरया दरवाज्यांच्या मधील भागात जकीरा करण्याची भुयारे आहेत.

लोहगडाचा हा द्वारसमूह आगळावेगळा आहे आणि विचारांती बांधलेला आहे.गडावर गेल्यावर वरच्या बुरजावरून हा सर्व मार्ग न्याहाळता येतो.कड्याच्या टोकावरचे हे बांधकाम विचार करावयास लावते.सध्या नवीन इमारती पडतात,मग हे असे बांधकाम अडीचशे तीनशे वर्ष कशामुळे टिकले याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहतनाही.


No comments:

Post a Comment