Wednesday 20 June 2012

चाकणचा संग्रामदुर्ग ...रणमंडळाचे चक्रव्यूव्ह

                         


काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल,अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.
आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर पडतो हे कळेनासे झाले आहे.असे का झाले? आपला इतिहास जतन करावयाच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत का? आक्रमकांविरुद्ध ज्या दुर्गानीच आपले स्वातंत्र्य आणि अस्मिता जिवंत ठेवली;त्या महाराष्ट्रातील दुर्गांची सद्यस्थिती पाहून यातना होतात.इतिहास जतन करण्याकडे लक्षच नाही.ते असते तर दुर्गांची अशी दारूण अवस्था झालीच नसती.
शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार हा चाकणचा दुर्ग आहे.बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शायीस्ताखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला.या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला.संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता.त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती.संग्रामदुर्ग म्हणजे काही नामांकित दुर्ग नव्हे.आधीच तो स्थलदुर्ग;पण खांद्काने वेढलेला.त्यामुळे थोडी बळकटी आलेला.खडकात पाणीही होते,शिवाय दिवस पावसाचे होते. २१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला. हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला.

तोफा बंदुकांचा काही उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर शायीस्ताखानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा केली.ताबडतोब कामाला सुरवात झाली.हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते.
आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते.३००-३५० लोकांनीशी फिरंगोजी नरसाळ्याने चाकण झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला. मुघलांनी सुरुन्गाला बत्ती दिली.
पूर्वेच्या कोपरयाचा बुरुज अस्मानात उडाला.त्यावरचे मराठेही हवेत उडाले.आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले.फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली.तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली.दुसर्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघलांनी चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला

या दुर्गात एक आश्चर्यकारक रचना आहे.झाड-झाडोरा वाढल्यामुळे हि योजना नित पाहता येत नाही. पूर्वेच्या बाजूला आत आल्यानंतर उजव्या बाजूला एक मोठे प्रवेशद्वार लागते. तीच वाट आहे असे समजून कोणी चालू लागला कि, वाट हळू हळू निरुंद होत जाते आणि सरतेशेवटी बंद होते. तटावरच्या लोकांना आत आलेला शत्रू अलगद मारयात सापडतो.
अशा रचनेला 'रणमंडळ' म्हणतात.ते चाकणच्या संग्रामदुर्गात आहे.

No comments:

Post a Comment