Wednesday, 20 June 2012

पुणेकरांचा आवडता सिंहगड . . . .




पुण्यानजीक असणारा आणि पुणेकरांचा आवडता सिंहगड प्राचीन दुर्ग आहे.इसवी सन १३५० मध्ये इसामीने लिहिलेल्या 'शाहनामा-ए-हिंद' अथवा 'फुतूह स्सलातीन' या ग्रंथात 'कुंधीयाना' म्हणून या दुर्गाचा उल्लेख आला आहे.इसवी सन १३२८ मध्ये मुहम्मद तुघलकाने एका कोळ्याकडून हा दुर्ग जिंकल्याचा उल्लेख त्या ग्रंथात आहे.पुरंदरच्या तहाच्या वेळेस शिवाजीमहाराजांनी जे २३ दुर्ग मुघलांना दिले,त्यात सिंहगड होता.पुढे तानाजी मालुसरे यांनी किल्ला घेण्यासाठी आपला बळी स्वराज्याच्या वेदीवर चढवला.त्यावेळेस राजे म्हणाले,'एक गड आला;पण माझा सिंह गेला'.

पुढे औरंगजेबाने हा दुर्ग जिंकल्यावर त्याचे नाव ठेवले 'बक्षिंदाबक्ष' म्हणजे बक्षीस देणारा जो त्याने दिलेले बक्षीस.इंग्रजांनी इसवी सन १८१८ मध्ये हा काबीज केला तेंव्हा त्याची सहा महिने लुट चालली होती.उन्हाळ्यात गडाची हवा उत्तम असल्याने तेथे राहण्यासाठी म्हणून इंग्रजांनी जवळजवळ ७० बंगले बांधल्याची एक जुनी नोंद आहे.

गडाला पुण्याकडील वाटेवर तीन दरवाजे आहेत,तर कल्याण गावाकडील वाटेवर दोन दरवाजे आहेत.पूर्वीचे टाके;पण इंग्रजी काळातील पागा,वाड्याची जोती,अमृतेश्वर आणि कोंढानेश्वराची मंदिरे,राजाराममहाराजांची आणि तानाजी मालुसरे यांच्या समाध्या अशा अनेक वस्तू पाहण्यासारख्या आहेत.

गडावर पाण्याच्या अनेक टाक्या आहेत.वनखात्याच्या नोंदीनुसार गडावर साडेतीनशे पाण्याच्या टाकी आहेत.एका टाकीबद्दल सांगायचे झाले तर,या टाकीचे नाव आहे.'देवटाके' देवटाके वरून लहान पण आत बरेच पसरत गेलेले आहे.सध्या सिंहगडावर पर्यटकांची वर्दळ वाढलेली आहे.सुमारे ४ लाख च्यावर पर्यटक दरवर्षी सिंहगडावर येतात.हे सर्व पर्यटक आणि गडावरची माणसे देवटाकीचे पाणी पिण्यास वापरतात.देवटाके सर्वांची तहान भागवते.आजवर ते कोरडे पडल्याची माहिती नाही.
देवटाकीचे पाण्याचे स्त्रोत आतून कसे आहेत,हे सांगणे अवघड आहे.एकाने पाच दहा खांबापुढे पोहत गेल्यावर पुढे अंधार असल्याने परत आल्याचे सांगितले आहे.डोंगराच्या पोटात कोठेतरी नक्की पाण्याचा प्रचंड साठा असल्याचे दिसते.पाण्याच्या साठ्याची हि जागा कोणी शोधली असावी?

No comments:

Post a Comment