Wednesday, 20 June 2012

सिंधुदुर्ग टोपकरांच्या ऊरावर ....



सिंधुदुर्ग म्हणजे अठरा टोपकरांच्या ऊरावर शिवप्रभूनी उभारलेला एक बळकट जलदुर्ग आहे.मालवण नजीक असणारे कुरटे नावाचे हे बेट तटबंदी घालून बंदिस्त केले आहे.आरमार पावसाळ्यात वसवण्यासाठी उत्तम बंदराचा आणि जंजिर्याचा आसरा लागतो.गोव्याच्या पोर्तुगीजांनी शह देण्यासाठी या दुर्गाची रचना केली गेली.

सिंधुदुर्गाच प्रवेशद्वार जीभीचे आहे.त्यातून आत आल्यावर उजवीकडे वळून पायर्यांवरून फांजीवर गेल्यास दोन घुमट्या आहेत.तेथील दोन घूमट्यात चुन्यात हातापायांचे ठसे आहेत.ते 'तीर्थरूप कैलासवासीमहाराज राजश्री छत्रपती' यांच्या हातापायांचे आहेत,असे इ.स.१७६२ मध्ये कोल्हापूरच्या जिजाबाई यांनी सिंधुदुर्गचा किल्लेदार येसाजी शिंदे याला पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे.
तटबंदीवरून आपल्याला गडाची प्रदक्षिणा पूर्ण करता येते.प्रवेशद्वारातून पुढे गेल्यास डाव्या हाताला एक आगळेवेगळे नारळाचे झाड आहे.त्या झाडाला दोन फांद्या आहेत आणि दोन्ही फांद्यांना नारळ लागले आहेत.तेथून पुढे गेल्यास शिवराजेश्वर मंदिर आहे.हे शिवाजीमहाराजांचे मंदिर त्यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधलेले आहे.आत शिवाजीमहाराजांची मूर्ती आहे.

दुर्गावर गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत.दहिबाव,दुधबाव,साखरबाव अशी त्यांची नवे आहेत.कोल्हापूरच्या छत्रपतीकडे या दुर्गाचा ताबा आहे.काही काळ चाच्यांनी हा दुर्ग ताब्यात घेतला होता.इंग्रजांनी चाच्यांकडून हा दुर्ग जिंकून त्याचे नाव ठेवले 'फोर्ट ऑगस्टस'
सिंधुदुर्गाचे एक मोठे वैशिष्ट्य आहे.त्याच्या तटबंदी चा परीघ ५-६ किलोमीटर तरी आहे.त्या तटबंदी वर जाण्यासाठी ४५ जिने बांधलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तटबंदीतच ४० शौचकुपे आहेत.इतक्या मोठ्या संखेने शौचकुपे असल्याचे इतर दुर्गात आढळत नाही.मळाचा कोणताही त्रास दुर्गात होत नाही.दुर्गाचे क्षेत्रफळ २० हेक्टर असावे.आत सुमारे अडीच-तीन हजार लोक दुर्ग लढवण्यास असताना स्वच्छतेची इतकी उत्कृष्ट व्यवस्था करणाऱ्या त्या स्थापतीचे कौतुक करावयास हवे.

सिंधुदुर्गाची हि रचना अभ्यास करण्यासारखी आहे.सध्या दुर्गाला ४० ठिकाणी भगदाडे पडली आहेत.त्यातून सागराचे पाणी आत येते.इथे समुद्रात डॉल्फिन्स हि आहेत.सिंधुदुर्गाची वैशिष्ट्य पाहण्याची सहल अभ्यासपूर्णठरेल.


No comments:

Post a Comment